Talk:Rahimatpur

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

ऐतिहासिक रहिमतपूर[edit]

रहिमतपूर हि प्राचीन वारसा लाभलेली विश्वविजेत्या दक्ष राजाची राजधानी... या भूमीतच दक्ष राजाची कन्या सतीने भगवान शिवशंकरास वर म्हणुन प्राप्त केले. दक्ष राजाने आयोजित केलेल्या विश्वशांती यज्ञास उपस्थित राहण्यासाठी आलेले ब्रम्हदेव व सकल देव गण याच भुमीतील तीर्थक्षेत्र ब्रम्हपुरी येथे मुक्कामास होते. येथेच भगवान शिवशंकर कुंभेश्वराच्या रूपाने प्रकट झाले होते. म्हणुनच अदिलशाहीपुर्वी या नगरीस “कुमठे कुंभेश्वराचे” या नावाने ओळखले जात होते. या कुंभेश्वराचे व त्याच्या रक्षणासाठी उभ्या असणार्‍या भैरोबाचे मंदीर आजही जागृत देवस्थाने म्हणुन प्रसिध्द आहेत.

अशाप्रकारे अनादिकालापासून देवादिकांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या या भुमीत शिवछत्रपतींच्या आदर्शांपासून दूर जाणार्‍या पेशव्यांनाही अनेकवेळा हरवणार्‍या शौर्यधुरंधर, रणमर्द, श्रीमंत सरदार फत्तेसिंह माने यांनी आदिमाया महिषासुरमर्दिनीचे व मान्यांचे श्रद्धास्थान जोगेश्वरीचे रूप असलेल्या, दक्षिण भारतात मुळ ठाण असणार्‍या श्री. चौंडेश्वरी देवीची मुर्ती घोडयावरून ‘भाळवणी’ येथून आणुन या नगरीत स्थापन केली ते आर्इ जगदंबेचा अंश असलेले श्री चौंडेश्वरीचे जागृत मंदीर आजही या नगरीच्या ऎतिहासीक वारसाची साक्ष देत आहेत. 
असा प्राचीन गौरवशाली इतिहास लाभलेल्या या नगरीत वास करणार्‍या ब्रम्हवृंद, साधुसंत व नगरवासीयांचे (शास्त्रानुसार अशुभ समजल्या जाणार्‍या दक्षिण दिशेकडुन येणार्‍या)  संकटांपासुन रक्षण व्हावे या भावनेतून दक्षिणाभिमुखी संकटमोचन हनुमान मंदिराची स्थापना केल्याचे आढळून येते. हे देवस्थान जागृत व रोकडा रोकडी नवसाला पावणारे असल्यानेही त्यास “रोकडेश्वर” म्हणुन ओळखले जाते अशी वंदता आहे.
रहिमतपूर नगरी ही पुर्वीचे कुमठेकुंभेश्वर व त्याच्या अठरा कोसातील पंधरा वाडयांनी एकत्रीत बांधलेली देवभुमी; येथे असंख्य साधुसंत साधनेस व वास्तव्यास होते. अशाच आदिलशाहीतील पराक्रमी सरदार रणदुल्लाखानास येथील मीरा सय्यद उर्फ बाबा प्यारे निरंजन यांच्या पवित्र दर्शनाने ईश्वरी कृपा (रेहमत) प्राप्त झाली, ईश्वरी कृपेची अनुभूती झालेल्या रणदुल्लाखानाने हिंसेचा मार्ग सोडून सरदार म्हणुन असलेली त्याची जबाबदारी बादशहाच्या परवानगीने व पुढील कालावधीत निरंजन बाबांचे शिष्य म्हणुन मौजे कुमठे येथे वास्तव्य करून राहीला. अशा प्रकारे रणदुल्लाखानावर परमेश्वराची कृपा (रेहमत) झाली म्हणुन रणदुल्लाखानाने संत निरंजन बाबा उर्फ मीरा हुसैनी सययद यांच्या शिष्याकडुन संपुर्ण नगरीचा आराखडा तयार करून घेतला व रहिमतपूर या नावाने “परमेश्वरी कृपा असणारे” नगर या अर्थाने नगर वसवले. या नगरीचा आराखडा सारीपाटाच्या रचनेसारखा आहे. या आराखडयातील नगरीचा रक्षणकर्ता म्हणुन रोकडेश्वरास असलेले मानाचे स्थान पाहिल्यास रोकडेश्वराचे महात्म्य व त्याच्या ईश्वरी शक्तीची प्रचिती येते. नगराच्या उत्तर बाजुने दक्षिण दिशेकडे दृष्टी असलेल्या या संकटमोचन रोकडेश्वर मंदीराची रचना अप्रतिम आहे; मंदीरासमोरच प्रशस्त प्रांगण, प्रांगणाच्या दक्षिणेस मधोमध पवित्र मानला जाणारा पिंपळ वृक्ष, त्यास दगडी पार (बैठक) व तेथुन अगदी सरळ रेषेत दक्षिणेकडे दूरपर्यंत नगराची हद्द संपे पर्यंत प्रशस्त प्रमुख मार्ग. या मार्गाच्या दोन्ही बाजुस जो दगडी जोत्यावरील घरे व घरासमोर ऐटबाज प्रशस्त अंगण अशी रचना, हा नगरातील मुख्य बाजारपेठ मार्ग आजही शहराचा मुख्य मार्ग म्हणुनच ओळखला जातो या मुख्य मार्गाच्या पुर्व व पश्चिम दिशेस आतील भागातील वसाहतीतुन निघणारे मार्ग उत्तरेकडे येवुन श्री रोकडेश्वर मंदीराच्या प्रागंणात श्री रोकडेश्वर चरणी नतमस्तक होवुन विलीन होतात. यावरून त्या काळातील प्रगत नगरआराखडयांची व त्यामध्ये श्री रोकडेश्वर मंदीरास असणार्‍या मानाच्या स्थानाची कल्पना येते या सोबतच नगरातील सर्व विभागातुन येणारे मार्ग उत्तरेकडे येवुन श्री रोकडेश्वर मंदीरापाशी येतात याचाच अर्थ श्रीमंत रोकडेश्वर दर्शन सर्व नगरवासीयांना सुलभपणे व्हावे हा दृष्टीकोन समोर ठेवुनच नगराचा आराखडा केला असल्याचे प्रकर्शाने जाणवते.
यासोबतच रोकडेश्वराच्या पायर्‍या पासुन सुरू होणारा नगराचा मुख्य मार्ग नगराच्या दक्षिण हददीपर्यंत अगदी सरळ आहे. आजही स्वच्छ वातावरण असताना रोकडेश्वर मंदीरा समोरून दक्षिणेकडे पाहील्यास कमंडलु नदीच्या दक्षिणेपर्यंतचा मार्ग व परिसर स्पष्ट दिसतो. म्हणजेच श्रीमंत रोकडेश्वर दक्षिणेकडुन येणार्‍या संकटावर लक्ष ठेवुन त्यापासुन नगरवासीयांचे रक्षणास व कल्याणास सज्ज असल्याचे दिसते.
आदिलशाहीच्या काळात रहिमतपूर हे महत्वाची प्रसिध्द व गजबजलेली व्यापारी बाजारपेठ होती, त्यामुळे या नगराकडे अमाप श्रीमंती व वैभव प्राप्त होते या जागृत हनुमान मंदीरामुळेच येथील वैभव व रोकड टिकुन असल्याच्या धारणेनेच  हा दक्षिणमुखी हनुमान श्रीमंत रोकडेश्वर म्हणुन ओळखले जावु लागले व तीच ओळख आजपर्यंत टिकुन आहे. 
सदरचा काळ हा शिवछत्रपतींच्या उदयाचा काळ होता. शिवाजी महाराजांनी त्यांच्या शौर्याने व तेजाने विजापुरकरांना जेरीस आणले होते म्हणुन विजापुरकरांचे आदेशाने शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजलखान हा बलदंड योद्धा सरदार मोहिमेवर निघाला व पंढरपुर, तुळजापुर अशी हिंदुंची अनेक श्रध्दा स्थाने उध्वस्थ करीत रहिमतपूर मार्गे प्रतापगडावर जाणार होता त्यामुळे रहिमतपूर नगरीचा अध्यात्मीक मानबिंदु असणार्‍या रोकडेश्वर मंदिराकडे अफजलाखानाची दृष्ट जावू नये यासाठी नगरवासीयांनी खास धार्मिक विधी करून संरक्षक लेप देवुन झाकुन ठेवले होते हा लेप दिल्यानंतर तेथे एकादे वारूळ भारावे अशी रचना केली होती, दरम्यान अफजलखानाची तुकडी रहिमतपुरात मुक्कामी आली होती. परंतु अफलजखानास ओढ होती ती प्रतापगडावर जावुन शिवाजी महाराजांना पकडण्याची त्यामुळे अफजलखानाचा जास्त मुक्काम असणार नाही, ही बाब हेरून रहिमतपुराताली माने घराण्यातील वीरांनी अफलखानाच्या तुकडीस त्रास देवुन जेरीस आणले होते. यामुळे अफलखानाचे लक्ष विचलित करून त्यास धार्मिक स्थळांना उपद्रव देण्याइतपत वेळ मिळु दिला नाही, तरीही खानाने देवस्थानांना त्रास दिलाच. खान हा नगरीतील मुख्य रस्त्यानेच रोकडेश्वर मंदीरा शेजारून गेला त्यावेळी रोकडेश्वराच्या पश्चिम बाजुकडील ओढयाशेजारील उताणा मारूतीचे मंदीर उध्वस्त केलेच परंतु तो श्रीमंत रोकडेश्वराची पवित्रता भंग करू शकला नाही अशी अख्यायीका आहे. 
खान हा रहिमतपूर नगरीतुन बाहेरपडताना रहिमतपूर नगरीच्या रक्षणकत्र्या रोकडेश्वरास उपद्रव देण्याचा अयशस्वी प्रयत्न करून खानाने किल्ले प्रतापगडाच्या दिशेने कूच केली. परंतु रहिमतपूर पासुन अवघ्या एक दिड मैलावर खोलगीरा येथे खानाचा खण हत्ती रूतला तो खुप प्रयत्न करूनही बाहेर निघेना दरम्यान तेथुन निघालेल्या एका साधुने अफलखानास त्याचा खण रूतने ही दैवी चेतावणी असल्याने माघारी फिर अन्यथा जिवास मुकशील अशी भविष्यवाणी केली होती. या घटनेची शिवकालीन बखरीमध्ये नोंदही आहे. परंतु मदमस्त खानाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे येथून गेलेला खान प्रतापगडावरून परत माघारी आलाच नाही अशी अख्यायीका आहे. यावरूनच साक्षात परमेश्वराची रेहमत म्हणजेच कृपा असलेल्या या देवभुमीस व येथील रोकडेश्वरास उपद्रव देण्याचा प्रयत्न करणार्‍या खानाबद्दल एकदिड मैलावर घडलेली घटना व अफझलखानाचा प्रतापगडावर झालेला अंत या देवभुमीची अध्यात्मीक शक्ती दाखवते.
अशाप्रकारे विवीध प्राचीन व ऐतिहासीक घटनांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सबंध असणार्‍या रोकडेश्वर मंदीराच्या रक्षणासाठी केलेले कवच शेकडो वर्षे तसेच राहीले व त्या शेकडो वर्षात श्री रोकडेश्वरावरील हा लेप बर्‍याच प्रमाणात निघुन गेला परंतु मुळ मुर्तीवर त्यालेपाचे कवच तसेच टिकुन होते. परंतु नगरीतील भावीक मात्र तशाच अवस्थेत या रक्षणकत्र्याचे मनोभावे पुजाअर्चा करीत होते. मात्र या कालावधी दरम्यान असणार्‍या युध्द जन्य परस्थितीमुळे रोकडेश्वराच्या कोजागरी पोर्णिमेच्या उत्सवाची परंपरा काही काळासाठी खंडीत झाली होती. ती परंपरा पुन्हा चालु करण्यासाठी त्यावेळचे रहिमतपूरचे वतनदार श्रीमंत विठुजी महालोजी माने यांनी पत्र व्यवहार करून पुढाकार घेतला व सहकार्यही दिल व त्यांच्या पाठबळानेच रोकडेश्वराचा अनेक वर्षे खंडीत झालेला कोजागरी उत्सव पुन्हा जल्लोषात चालू झाला. 
परंतु मूळ मुर्तीवरील कवच काढुन खानाच्या स्वारी वेळच्या त्या बंधनातुन मुळ मुर्तीस मुक्त करण्याचे धारिष्ठय होत नव्हते, कदाचीत याची वेळ रोकडेश्वरानेच ठरवलेली असावी. दरम्यास सन 1958 साली एका तपस्वी योगविद्या सिध्द का​शी येथील तेजस्वी बाल योगीं हे रहिमतपूर येथे आले होते ते अध्यात्माचे गाढे अभ्यासक ह.भ.प कै. हणमंतराव भाउसो माने, कै. कोंडीराम माने कै. रामचंद्र बाजारे, कै. उद्धव टकले  यांचे संपर्कात आले. यावेळी येथील ग्रामस्थांच्या अग्रहावरून बालयोगींनी रोकडेश्वराचे मुळमुर्ती वरून कवच काढणेचा विधी करण्याचे मान्य केले मग या नगरीत या विधीची अत्यंत धामधुमीत तयारी सुरू झाली बालयोगी जमीनीखाली तपसाधनेसाठी बसले व त्याठिकाणच्या बरोबर वरील बाजुस मोठे यज्ञकुंड उभारले आणि  ब्रम्हवृंदाच्या नादमंत्र घोषात यज्ञयाग चालु झाले. साधारण दोन-तीन दिवस यज्ञकुंडा खाली तपसाधनेस बसुन तेजस्वी बालयोगी बाहेर आले व त्यांनी मंत्र घोषात श्रीमंत रोकडेश्वराचे लेपरूपी कवचास हात लावताच कवच आहे असे बाहेर निघुन आले.
अशाप्रकारे रोकडेश्वराच्या मुळ रूपातील दर्शनाने रोकडेश्वराच्या भक्तांनी त्यावेळी दिवाळी साजरी केली त्याचवेळी बालयोगींनी खानाने भंगकेलेली उताना मारूतीची मुर्ती काढुन ती ब्रम्हपुरी येथे मंत्रविधींनी विसर्जीत करून मंदीरात नवीन मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. त्याच कालावधीत रोकडेश्वर मंदीराचा जिर्णोद्धार भक्तांनी केला. व एक छान व ऐटदार मंदीर भावींकांसाठी उपलब्ध झाले. भव्य निवारा उपलब्ध झाल्याने या मंदीरात वर्षभर विवीध धार्मिक उपक्रम सुरू झाले. हनुमान जयंती, हरिपाठ आणि कोजागरी पोर्णिमेस भव्यदिव्य असा पारंपारिक बाज असलेला उत्सव मोठया उत्साहात साजरे केले जात आहेत. 

प्राचीन परंपरा लाभलेल्या या मंदीराची रचनाही खास आहे. बाजुने मोठया प्रशस्त खिडक्या, दिवळया, मध्यभागी लाकडावर कोरीव काम केलेला सुंदर मंडप, दोन्ही बाजुस मोठे लाकडी खांब, मंडपावर सुबक हंडया व झुंबरे आणि मध्यभागी अत्यंत सुंदर कलाकुसर असलेले शिखराचे सिंहासन यावर श्री रोकडेश्वर विराजमान आहेत. तेथेच पुर्वमूखी गणेश तर मंदीरातच र्इशान्य कोपर्‍यात स्वतंत्रपणे महादेवाची पिंड स्थापित आहे. अशाप्रकारे श्रीमंत रोकडेश्वरासोबत सर्व शक्तीशाली शिवशंकर व बुध्दीदेवता श्री गणेश हे या मंदीराच्या आध्यात्मीक शक्तीची वृध्दी करीत आहेत. रोकडेश्वराच्या महात्म्यामुळे तसेच आलेल्या अनुभवातूनच औंधच्या पंतप्रतिनीधींनी त्यांचा गजराज कोजागरी उत्सवात श्रींमंत रोकडेश्वराच्या सेवेत दिला होता. रोकडेश्वराचा कोजागरी उत्सव हा रोकडेश्वराचे आध्यात्मिक महत्व पटवुन देतो. कोजागरी पोर्णिमेच्या शितल चंद्र प्रकाशात दुग्ध प्राशनाने लक्ष्मीची कृपा होते असा विश्वास आहे. कोजागरी पोर्णिमेस माता लक्ष्मीचा पूर्ण रात्रभर पृथ्वीतलावर वावर असतो. म्हणुन या रात्री लक्ष्मीची कृपा होणेसाठी पौर्णिमेच्या रात्री अध्यात्मिक उपक्रम, नामस्मरण, जागरण करावे व लक्ष्मी मातेच्या स्वागतास सज्ज रहावे अशी अध्यात्मीक धारणा आहे. लक्ष्मी ही समृध्दी व वैभवाची प्रतीक आहे. तर रोकडेश्वर हा संकटकाळी भक्तांच्या नवसाला रोकडा रोकडी पावणारा आहे. या दोघांचाही संबध भक्तांच्या सुख: समृध्दीच्या मनोकामना पुर्ण करण्याशी आहे. म्हणुनच कोजागरी पोर्णिमेस श्रीमंत रोकडेश्वरा समोर अडचणीचे गा-हाणे घेवुन समृध्दीसाठी साकडे घालणारे भक्त पुढील वर्षीच्या कोजागरी पोर्णिमेस नवस फेडण्यास हमखास हजर असतात.

असा हा श्रीमंत रोकडेश्वराचा उत्सव दिवसेंदिवस वृध्दींगत होत चालला आहे. हा फक्त उत्सव नसुन तो एक पवित्र व धार्मिक विचांरांचा मेळावा आहे. म्हणुनच कोजागरी उत्सवाची सुरवात घटस्थापनेच्या पाचव्यामाळे पासुन होते. येथुन कोजागरी पोर्णिमे पर्यंत प्रसिध्द अशा राष्ट्रीय किर्तनकारांची विवीध किर्तन पुष्पे गुंफली जातात. पारंपारीक पध्दतीने लाखो भावींकांच्या गर्दीत पुर्णरात्रभर कोजागरी उत्सव मोठया भक्तीभावाने साजरा केला जातो.  कोजागरी पौर्णिमेस सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी असते. रात्री बारा पूर्वी श्रींचा छबिना निघतो पालखी नगरप्रदक्षिणा करून पहाटे ६ च्या सुमारास मंदिरात परत येते. याच वेळी श्रींच्या हातातील लिंबू आणि हारांचे लिलाव चुरशीने होतात यावेळी लावल्या जाणाऱ्या बोल्यासाठी लावलेल्या अवाढव्य रक्कमा पहिल्यावावर लोकांची श्रद्धा लक्षात येते, लिलावानंतर नवस बोलले जातात तर जुने नवस रोकडा रोकडी फेडले जातात. तर या उत्सवाचा समारोप काल्याच्या किर्तनाने होतो. 
हा उत्सव ४०० वर्षे पूर्वी पासून मोठ्या थाटामाटात लाखो भक्तांच्या सानिध्यात साजरा होतो आहे. या उत्सवात ढोल करंडक, झांजपथके, लेझीम,  मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, पोवाडा, भेदिक, मोरांगी, संगीत भजन, डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा, दांडपट्टा, विविध ऐतिहासिक खेळ आणि कला यांचे मोठे प्रदर्शन भरते सोबतीला मनोरंजनात्मक खेळ, पाळणे विविध दुकाने याने अवघी रहिमतपूर नगरी गजबजून जाते सोबतीला भव्यदिव्य अशी विद्युतरोषणाई असते जणू या कोजागरी पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशात अवघे रहिमतपूर स्वर्गाहून सुंदर नगरी बनून जाते. अशा या उत्सवाला प्रत्येकाने भक्तिभावाने यावे अन रोकडेश्वर दर्शनाने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून स्वर्गानंदात न्हाऊन तृप्त व्हावे असा हा उत्सव आहे. 
कोजागरी उत्सवासोबत रोकडेश्वर मंदीरात नियमितपणे हरीपाठ होतो, विवीध व्याख्याने, समारंभ, हनुमान जन्मोत्सव, गाथा रामायण सोहळा, गणेश उत्सव, शिवजयंती असे नानाविध धार्मिक उत्सव मोठया उत्साहात साजरे होतात. यामुळे रोकडेश्वरास भक्ती, सद्गुणी विचारांचे असे आध्यात्मिक वलय प्राप्त झाले आहे. हा रोकडेश्वर रहिमतपूर नगरी सोबतच महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडयातील अनेक ठिकाणी आढळतो. खरेतर कलीयुगात देवतांमधील जागृत अवतार म्हणुन भगवान हनुमानास ओळखले जाते. याच अध्यात्मिक जागृतपणाची प्रचिती देणारे ठिकाण म्हणजेच हे रहिमतपूर मधील श्रीमंत रोकडेश्वर मंदीर हाच मायबाप रोकडेश्वर तुम्हा आम्हास त्याच्या चैतन्यमय कृपेने सदैव संपन्न व समृध्द करीत आहेत. म्हणुनच अशा श्रीमंत रोकडेश्वराचा ज्ञात अज्ञात इतिहास पुढील पिढीस माहित असावी अशी सर्वांची भावना .  Swapnil1902 (talk) 03:48, 7 October 2017 (UTC)[reply]